प्रशांत चंदनखेडे वणी :-
हुंड्याच्या लालसेपोटी विवाहितेवर सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलेचा पती हा भारत संचार निगम लिमिटेड मध्ये अभियंता पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे.
तक्रारदार महिलेचा 26 फेब्रुवारी 2018 रोजी आदिलाबाद (तेलंगणा) येथील गन्नेवार कुटुंबात विवाह झाला होता. तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींना लग्नापूर्वी 20 लाख रुपये, 40 तोळे सोने आणि चारचाकी वाहन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही पैशांची मागणी थांबली नाही. सासरकडून वारंवार पैशाची मागणी होतंच राहिल्याने त्यांना आणखी ३० लाख रुपये देण्यात आले. आजपर्यंत सुमारे 50 लाख रुपये आणि 40 तोळे सोने हुंडा स्वरूपात देण्यात आल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
“पैसे आण, नाहीतर घर सोड” — अशा शब्दांत वारंवार धमक्या देत 4 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे विवाहिता ही आपल्या मोठ्या आईकडे पैसे आणण्याकरिता गेली. आणि स्वतःच्या आईलाही तेथे बोलावून घेतले. मात्र पैशाची जुळवाजुळव न झाल्याने 5 फेब्रुवारीला महिला मुलीसह सासरी परतली. परंतु तिला पती, सासू व सासऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केस ओढत घराबाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. सासरच्या मंडळींनी मारहाण करून घराबाहेर काढल्यानंतर पीडितेने 100 क्रमांकावर संपर्क साधल्याने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
यापूर्वीही 29 एप्रिल 2024 व 14 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मारहाणीचे वैद्यकीय अहवाल उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. 23 फेब्रुवारी 2020 रोजी चांगली वागणूक देण्याबाबत सासरच्यांनी स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देऊनही छळ सुरूच राहिल्याचा आरोप आहे.
नंतर प्रकरण महिला समुपदेशन केंद्र, पांढरकवडा येथे पाठविण्यात आले होते; मात्र “माझ्या आणि मुलीच्या जीवाला धोका आहे” असे लेखी देत पीडितेने समुपदेशन नाकारले. परंतु सासरच्या मंडळींनी छळाची अगदीच परिसीमा गाठली. पती व सासू सासऱ्यांचा छळ असह्य झाल्याने महिलेने शेवटी मुकुटबन पोलीस ठाण्यात पती, सासू सासरे, व दिर यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी चौघांवरही बीएनएसच्या कलम 115(2), 296, 3(5), 351(2), 352, 58 नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जीवघेण्या छळामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

No comments: