Latest News

Latest News
Loading...

वणीकरांकडून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना कृतज्ञ अभिवादन


प्रशांत चंदनखेडे वणी :-

देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जागवत ठेवण्याकरिता वणी शहरात शनिवारी सायंकाळी भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना कृतज्ञता पूर्वक अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सायंकाळी ७ वाजता श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहीद जवानांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांना उपस्थितांनी आदरांजली वाहिली. “वीर जवान अमर रहे” व “भारत माता की जय” अशा देशभक्तीच्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान झाले होते. देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या जवानांचे स्मरण म्हणून दरवर्षी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

या वेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण केले. देशाच्या अखंडतेसाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांचे योगदान शब्दांत मांडणे अशक्य असून, त्यांच्या शौर्याची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला नगरसेवक अजय धोबे, नगरसेवक अनिकेत बदखल, माजी नगरसेवक राजू तुराणकर, मनिष बत्रा, मिलिंद बावणे, विनोद दुमणे, ऋषी काकडे, कैलास पचारे, तेजस नागतुरे, संजोग झाडे, निलेश चिंचोलकर, सुयश नगराळे, सोनू नरड, प्रफुल बोर्डे, आशिष रिंगोले, श्रीकांत उके, रौनक बिलोरिया, आदित्य बिलोरिया तथा युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. देशरक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या वीर जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी त्यांच्या स्मृती सदैव जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.