Latest News

Latest News
Loading...

शुल्लक कारण, प्राणघातक हल्ला! कुऱ्हाडीचा वार आणि काठ्यांनी बेदम मारहाण, कुटुंबातील चार जण जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

ग्रामीण भागातील आपसी कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केवळ रस्त्यावरील बाज (खाट) हटविण्याच्या शुल्लक कारणावरून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील साखरा गावात उघडकीस आली. चार जणांनी एका कुटुंबावर कुऱ्हाड व काठ्यांनी हल्ला चढविल्याने गावकुसात भीतीचे सावट पसरले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात देवानंद बिलबिले, सागर बिलबिले, समीर बिलबिले व तुळशिराम बिलबिले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 118(1), 296, 115(2), 352, 351(2), 351(3), 324(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी पांडुरंग देवाळकर (वय ५५) हे आपल्या घरी कापसाची गाडी भरत असतांना त्यांचा शेजारी राहणाऱ्या बिलबिले कुटुंबीयांसोबत घरासमोरील सिमेंट रस्त्यावर बाज (खाट) टाकल्याच्या कारणावरून वाद झाला. “रस्ता मोकळा करा, वाहन जात नाही,” एवढ्याशा शुल्लक कारणावरून आरोपी संतापल्याचे सांगितले जाते. वाद चिघळताच आरोपींनी देवाळकर यांना पकडून बेदम मारहाण केली. 

नंतर एका आरोपीने घरातून कुऱ्हाड आणून देवाळकर यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. आणि चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना वाचविण्यासाठी धावून आलेल्या पत्नी वंदना देवाळकर, मुलगी साक्षी देवाळकर व मुलगा प्रज्वल देवाळकर यांनाही काठीने मारहाण व अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आहे. या झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची चैन हरवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

घटनेवेळी काही मजूर प्रत्यक्षदर्शी असल्याचे सांगितले जाते. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ग्रामीण भागात किरकोळ कारणांवरून वाढणारे वाद आणि त्याचे हिंसक स्वरूप हे समाजासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याची चर्चा गावकुसात सुरू आहे. “गुंड प्रवृत्तीला आळा बसला नाही तर अशा घटना वाढतील,” अशा प्रतिक्रिया देखील स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील हिंचाराच्या घटना परत एकदा चर्चेत आल्या आहेत. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.