सीसीआयच्या कापूस खरेदी धोरणांबाबत शेतकरी संतप्त, कापूस खरेदीतील अडचणी दूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी येथील भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्रात सुरू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पवन एकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वणी येथील सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस खरेदी प्रक्रिया २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. तथापि, नोंदणीकृत शेतकऱ्यांनाही विक्रीसाठी निश्चित दिवस व वेळ देण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. कापूस घेऊन केंद्रावर गेल्यानंतर काही शेतकऱ्यांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागते, तर काहींची वाहने विविध कारणे देत परत पाठविली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘कापसाची गुणवत्ता चांगली नाही’, ‘कापूस ओलसर आहे’ किंवा ‘मागील हंगामातील आहे’ अशी कारणे सांगून खरेदी नाकारली जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या हमी दरावर विश्वास ठेवून कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी होत असून त्यांच्या श्रमांचा अवमान होत असल्याची व्यथा निवेदनातून मांडण्यात आली आहे.
यंदा पावसाचा कालावधी लांबल्यामुळे कापसाचे पीक उशिरा आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सीसीआयची कापूस खरेदी प्रक्रिया तसेच विक्रीसाठी दिवस व वेळ निश्चित करण्याची व्यवस्था ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, त्यांना प्राधान्याने संधी देण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आधीच कर्जबाजारी व नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच खरेदी प्रक्रिया शेतकरी हिताची व पारदर्शक व्हावी, यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन देतांना उपसरपंच शाम तराळे, बाळू खामनकर, राहुल आत्राम, संजय चिंचोलकर, नेताजी भोयर, बंडू खंडाळकर, कैलास पिपराडे, लक्ष्मण राजूरकर, राजू बांडरे, मंगेश उरकुडे, विनायक ढवस, अनंता बोढे, भवानी मांदाळे, अक्षय लोढे, विनोद पचकठे, विशाल दानव आदी उपस्थित होते.

No comments: