Latest News

Latest News
Loading...

लालगुड्यात संस्कारांचा सोहळा; बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लालगुडा येथे दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, बाल आनंद मेळावा, माता-पालक गट व महिला मेळावा अशा बहुआयामी उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शाळा परिसरात शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीवेचा संगम घडविणारा हा सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन लालगुडा ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता उपरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी अश्विनी ठमके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संध्या रामगिरवार, रमेश बोबडे, मुग्धा खानजोडे, राजेश घोनमोडे, कल्पना जिलटे, शारदा मेश्राम, सुवर्णा बावने, शालीकराव दुधलकर व शेषराव राजुरकर उपस्थित होते.

या प्रसंगी सरपंच गीता उपरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना व पालकांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले या महान व्यक्तिमत्त्वांवरील पुस्तके भेट देण्यात आली. वाचन संस्कृतीची जोपासना आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे, गीत-नृत्य, नाट्यछटा तसेच मैदानी स्पर्धांमधून आपले कला गुण सादर केले. बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्यभाव आणि सर्जनशीलतेला नवे बळ मिळाले. माता-पालक गट व महिला मेळाव्याच्या माध्यमातून शाळा आणि पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मोनाली पटेलपैक तसेच शिक्षक धनराज गोसावी व बालाजी बिडगर यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्धतेमुळे कार्यक्रमाची आखणी सुरळीत व प्रभावीपणे पार पडली.

लालगुडा शाळेचा हा उपक्रम केवळ सांस्कृतिक मेळावा न ठरता शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा ठरला असून ग्रामस्थांकडून आयोजनाबद्दल विशेष कौतुक व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.