नारळ (ओला) फोडण्याच्या सुऱ्याने युवकाचा निर्घृण खून, चेहरा छिन्नविछिन्न तर हाताचा पंजा धडापासून वेगळा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
ओला नारळ फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुऱ्याने (सत्तूर) युवकावर हल्ला चढविण्यात आल्याची धक्कादायक घटना १६ फेब्रुवारीला दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास घडली. सत्तूरचे एकामागून एक वार करून युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याने शिबला हे छोटेसे गाव हादरले आहे. शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सत्तूरचे निर्दयीपणे वार करण्यात आल्याने युवकाचा चेहरा छिन्न विछिन्न झाला होता. तर हाताचा पंजा शरीरापासून वेगळा झाला होता. व्ह्रदयाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेने झरी तालुक्यात चांगलीच खळबळ माजली आहे. संतोष मानकु टेकाम वय अंदाजे ४५ वर्षे असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात मध्यस्थी करण्यास आलेली त्याची पत्नीही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
झरी तालुक्यातील शिबला येथे राहणाऱ्या संतोष टेकाम याच्या घराशेजारी शालिक सिताराम आत्राम वय अंदाजे ३५ वर्षे हा कुटुंबासह राहतो. सोमवारी या दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येते. वाद चिघळल्याने शालिक आत्राम याने थेट नारळ फोडण्याच्या सुऱ्याने (सत्तूर) संतोषवर हल्ला चढविला. त्याने निर्दयीपणे संतोषवर सुऱ्याने सपासप वार केले. सुऱ्याने एकामागून एक वार करण्यात आल्याने संतोष याचा चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला. तर त्याच्या हाताचा पंजा तुटून जमिनीवर पडला. शेजाऱ्यांमधील झालेल्या वादातून एका युवकाचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने झरी तालुका पूर्णपणे हादरला आहे. ग्रामीण भागात हिंसाचाराच्या घटना प्रचंड वाढल्याने ग्रामवासीयांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
छोट्या छोट्या कारणांवरून होणारे वाद, न राहिलेला संयम आणि शस्त्रांनी हल्ला करण्यापर्यंत वाढलेली मजल, यामुळे ग्रामीण भागात हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शालिक आत्राम याने धारदार शस्त्राने वार केल्याने संतोष हा जागीच गतप्राण झाला. तर मध्यस्थी करण्यास आलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते. दोघांमध्ये असा कुठला टोकाचा वाद झाला की, शालिकने संतोषवर जीवघेणा हल्ला केला व त्याला यमसदनी धाडले, अशी चर्चा गावात सुरु आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता झरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून घटनेचा पुढील तपास पाटण पोलीस करीत आहे.

No comments: