Latest News

Latest News
Loading...

जैन लेआऊटमध्ये मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न उधळला; चोरटा नागरिकांच्या सतर्कतेमुळे जेरबंद


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील जैन लेआऊट परिसरात कुलूपबंद घराला लक्ष्य करत घरफोडी करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याचा डाव नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घरात चोरी करण्याचा केलेला प्रयत्न शेजाऱ्यांनी हाणून पाडला. मध्यरात्री घरात घुसून चोरीचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैन लेआऊट येथील रहिवासी सुभाष ब्राम्हणे यांच्या घराला कुलूप लागले असल्याची संधी साधून चोरट्याने सोमवारी (दि. ९ मार्च) पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घराच्या दरवाज्याचा कुलूपकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन आरोपीने चोरीचा डाव साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र घरात हालचाल करताना झालेल्या आवाजामुळे शेजारी राहणारे कुनाल अनिल पाऊनकर (वय २४) हे झोपेतून जागे झाले. संशय आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता घरात चोरटा शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ इतर शेजाऱ्यांना बोलावून घेतले. नागरिकांनी एकत्र येत चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याची ओळख सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (वय ३०, रा. पोहना ता. वणी) अशी पटली. 

या प्रकरणी फिर्यादी कुनाल पाऊनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४), ३०५(अ) व ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक विशाल राठोड करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.