महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा जागतिक महिला दिन शिंदोला येथे अदानी फाउंडेशनच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध मार्गदर्शनपर उपक्रम, मनोरंजक स्पर्धा आणि महिलांच्या सहभागाने हा कार्यक्रम रंगतदार ठरला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरणताई देरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उबाठा) महिला जिल्हाप्रमुख योगिता मोहर, तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे, शहर प्रमुख सविता आवरी, स्नेहल गौरसिया (क्लब प्रेसिडेंट, अदानी सिमेंट शिंदोला माईन्स), शिखा चॅटर्जी (प्राचार्य, अदानी स्कूल शिंदोला माईन्स), प्रगती पाल (फिल्ड ऑफिसर, सीएसआर), कलावती मोहितकर (सीएलएफ मॅनेजर, शिंदोला), रेखा बोबडे, कल्याणी खामानकर, मनीषा हेपट, रुपाली बोबडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान अदानी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी महिलांना विविध शासकीय व स्वयंरोजगार योजनांची माहिती देत महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन कसे साध्य करता येईल याबाबत विशेष मार्गदर्शन केले. महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बळकटी निर्माण केल्यास त्याचा कुटुंब व समाजाच्या विकासाला मोठा हातभार लागतो, असेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. स्पर्धांमधील विजेत्या महिलांचा बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे शिंदोला परिसरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments: