प्रशांत चंदनखेडे वणी :-
वर्षानुवर्षे अखंडपणे जपली जात असलेली रामनवमी शोभायात्रेची परंपरा यंदाही वणी शहरात नव्या उत्साहाने आणि भव्यतेने अवतरत आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेमुळे संपूर्ण शहर रामभक्तीच्या रंगात रंगणार असून, श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जुने स्टेट बँक परिसरातील पुरातन राम मंदिरातून रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ होईल. समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या नेतृत्वात निघणारी ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करत पुन्हा राम मंदिरात येऊन महाआरतीने शोभायात्रेचा समारोप होईल.
यंदाच्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अयोध्येतील रामललाची जिवंत प्रतिमा आणि हरियाणातील लाईव्ह हनुमानाचे सादरीकरण. या देखाव्यांमुळे शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त होणार आहे. याशिवाय रामरथ, पालख्या, सजवलेले घोडे, विविध बँड पथके आणि पारंपरिक वाद्यांचा गजर यामुळे शोभायात्रेची भव्यता अधिक खुलून दिसणार आहे.
भक्तिमय वातावरणाची उंची वाढवण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज देवस्थानाचे भजन मंडळ तसेच विविध भागांतून आलेली भजन मंडळी आपल्या सुरेल सादरीकरणातून वातावरण भारावून टाकणार आहेत. रामनामाच्या घोषात आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर वणी शहर अक्षरशः दुमदुमणार आहे.
ही शोभायात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरत आहे. विविध समाजघटकांचा सहभाग, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सामूहिक भावनेतून साकार होणारा हा सोहळा वणीच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा ठरत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो रामभक्त या शोभायात्रेत सहभागी होण्याची शक्यता असून, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भव्य सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परंपरेचा मान राखावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: