Latest News

Latest News
Loading...

शास्त्रीनगरमध्ये धक्कादायक प्रकार; बालकाला अश्लील कृत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकाला अटक


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील शास्त्रीनगर परिसरातील अल्पवयीन मुलाला अश्लील व अनैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर परिसरात राहणारे फिर्यादी आपल्या अल्पवयीन मुलासह घरी झोपलेले असताना त्यांच्या मुलाने फिर्यादीच्या अंगावरील लुंगी बाजूला करून अयोग्य प्रकारे स्पर्श केला. या प्रकारामुळे संशय निर्माण झाल्याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीने मुलाला विश्वासात घेऊन हा घाणेरडा प्रकार कुठून शिकला अशी विचारणा केली असता, त्याने सांगितलेली माहिती अतिशय धक्कादायक होती.

मुलाने सांगितले की, घराशेजारी राहणारा आकाश उर्फ अक्षय अरुण वांढरे (वय 30) याने यापूर्वी त्याला अशा प्रकारचे अश्लील व अनैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त केले होते. ही बाब समोर येताच फिर्यादी यांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठून यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकाश उर्फ अक्षय अरुण वांढरे, रा. शास्त्रीनगर वणी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 65 (2) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 5 (L)(M)(N), 6 व 10 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. अटक आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी (तुरुंग) सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका चौधरी करीत आहेत.

दरम्यान, समाजात वावरणारे काही नराधम चिमुकल्या मुलामुलींशी अश्लील वर्तन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी सतर्क राहून आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.