Latest News

Latest News
Loading...

घरून बेपत्ता असलेल्या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी :-

घरून बेपत्ता झालेल्या तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना रविवार ८ मार्चला दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या तरुणाने आत्महत्या केली की प्रकरण काही वेगळे आहे, याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहे. मात्र प्राथमिक तपासातून तरुणाने आत्महत्या केल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. समीर रमेश थोरात वय अंदाजे २१ ते २२ वर्षे रा. खडबडा मोहल्ला असे मृतक तारुणाचे नाव आहे. तो मागील सहा दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याबाबत कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदविली होती. त्याचा शोध सुरु असतांनाच आज त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेहच आढळून आल्याने कुटुंबियांवर दुःखाचा आघात झाला आहे.

शहरातील खडबडा मोहल्ला येथे कुटुंबियांसोबत राहत असलेला समीर हा २ मार्चपासून घरून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली होती. दरम्यान त्याचा शोध सुरु असतांनाच आज ८ मार्चला दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास खडबडा मोहल्ला परिसरातील गॅस गोदामाच्या मागे (रामघाट) निर्गुडा नदीजवळील झुडपात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

मुलगा घरून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेहच आढळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तरुणाने आत्महत्या केली की प्रकरण काही वेगळे आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास पोलीस करीत आहे. 


No comments:

Powered by Blogger.