Latest News

Latest News
Loading...

पूर्व नागपूरची जबाबदारी संजय खाडे यांच्याकडे; उल्लेखनीय कामगिरीची पक्षश्रेष्ठींकडून दखल

 

प्रशांत चंदनखेडे वणी :-

काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा वणी विधानसभा क्षेत्रातील सक्रिय नेते संजय खाडे यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. अचलपूर मतदारसंघातील उल्लेखनीय कामगिरीनंतर आता त्यांची पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

संजय खाडे हे शेतकरी व कामगार प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे नेते म्हणून ओळखले जातात. विविध आंदोलन, मोर्चे आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अचलपूर मतदारसंघात ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करत जनसंपर्क वाढवण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले होते. त्यांच्या या कामगिरीमुळेच पक्षाने त्यांच्यावर पूर्व नागपूरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मतदारसंघाची धुरा सोपवली आहे.

पूर्व नागपूर हा नागपूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मतदारसंघ मानला जातो. विविध समाजघटक, कामगार वर्ग, व्यापारी आणि युवकांचा मोठा सहभाग असलेल्या या मतदारसंघात नागरी प्रश्न, विकासकामे आणि पक्षनिष्ठा हे निवडणुकीचे निर्णायक घटक ठरतात. त्यामुळे या मतदारसंघाची जबाबदारी सक्षम नेतृत्वाकडे असणे आवश्यक मानले जाते.

दरम्यान, “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अचलपूरमधील अनुभवाच्या बळावर आता पूर्व नागपूरमध्येही पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला आणि कामगारांशी थेट संवाद साधत स्थानिक पदाधिकारी व नेत्यांशी समन्वय साधून पक्ष बळकट करणे हेच माझे उद्दिष्ट राहील,” अशी प्रतिक्रिया संजय खाडे यांनी दिली.

आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना दिले आहे. खाडे यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पूर्व नागपूरमध्ये पक्ष संघटनेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.