Latest News

Latest News
Loading...

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर बांबू काठीने हल्ला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रानेच मित्राला बांबू काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना वणी शहरात उघडकीस आली आहे. या मारहाणीत तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून याबाबत त्याने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

सुमीत राज मानकर (वय २०, रा. रंगनाथनगर, वणी) याने वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश उर्फ गणू बावणे (वय अंदाजे ३०, रा. भाग्यशाली नगर, वणी) हा वारंवार दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता. ३ एप्रिल रोजी त्याने परत दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. सुमितने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने सुमितशी वाद घातला. नंतर या कारणावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.

दरम्यान, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास सुमीत मानकर व त्याचा मित्र राकेश गायकवाड हे दिपक चौपाटी परिसरातील एका बारजवळ बसले असताना गणेश बावणे हा बांबूची काठी घेऊन तेथे आला. त्याने अचानक दोघांवर हल्ला चढवून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सुमीतच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

घटनेदरम्यान साहिल पुरी (रा. सेवा नगर) याने मध्यस्थी करत सुमीतला बाजूला केले. मात्र, आरोपीने राकेश गायकवाड याला पुन्हा मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला.

मारहाणीत जखमी झालेल्या सुमीतला प्रथम शासकीय रुग्णालय, वणी येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता एक्स-रेमध्ये त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले.

या प्रकरणी आरोपी गणेश उर्फ गणू बावणे याच्यावर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ११८(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.