प्रशांत चंदनखेडे वणी (यवतमाळ) :-
कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, वणी व मारेगाव येथे निदर्शने करण्यात आली असून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने सादर करण्यात आली.
राज्यातील ३९ आमदार अशोक खरात यांच्या तंत्र-मंत्र आणि भोंदूगिरीशी संबंधित असल्याचे आरोप समोर येत असून, अशा आमदारांची नावे राज्य सरकारने तातडीने जाहीर करावीत व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी माकपने केली आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असताना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वर्तन हे संविधानिक मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका माकपने केली. अशा प्रकारामुळे समाजात तंत्र-मंत्र, जादूटोणा यांसारख्या अंधश्रद्धांना अप्रत्यक्ष मान्यता मिळत असून सामान्य नागरिक भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसत आहे. हे व्हिडिओ तात्काळ हटवावेत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून तो कार्यान्वित करावा, जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि समाजमाध्यमांवर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यवतमाळ येथे निवेदन देतांना माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपूरी, कॉ. ॲड. डी. बी. नाईक, कॉ. चंद्रशेखर सिडाम, कॉ. देविदास मोहकर, कॉ. मनीष इसाळकर, कॉ. अनिता खुनकर, कॉ. ऊषा मुरखे, कॉ. रमेश मिरासे, कॉ. संदीप सुरपाम उपस्थित होते. तर वणी येथे गजानन ताकसांडे, बादल कोडापे, कवडू चांदेकर, संजय वालकोंडे, शंकर गाऊत्रे, अमोल चटप, संभा टांगे, अशोक गेडाम, भीमराव आत्राम आणि मारेगाव येथे रामभाऊ जिद्दीवार, श्रीकांत तांबेकर, बंडू मत्कुलवार, सुदर्शन टेकाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनामुळे जिल्ह्यात भोंदूगिरीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणात सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

No comments: