Latest News

Latest News
Loading...

मध्यरात्रीची हृदयद्रावक घटना; विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या


प्रशांत चंदनखेडे वणी :- 

वणी तालुक्यातील बोर्डा या गावातील एका युवकाने मानसिक तणावातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (५ एप्रिल) पहाटे उघडकीस आली. शनिवारी मध्यरात्री या युवकाने अचानक घरून पळ काढल्यानंतर रविवारी पहाटे विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे. राजेंद्र विलास दुर्गे (वय,३३) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र दुर्गे हे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येते. घटनेच्या रात्री त्यांनी “झोप येत नाही” असे घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर घरातील सर्वजण झोपल्यानंतर त्यांनी अचानक उठून घराचा दरवाजा बाहेरून बंद करून घराबाहेर पळ काढला.

काही वेळाने ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून त्यांचा शोध सुरू केला. त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर ते कुठेही आढळून न आल्याने कुटुंबीयांनी संशय म्हणून गावाबाहेरील विहिरीजवळ जाऊन बघितले. तेथे कुटुंबियांना त्यांचा मोबाईल आढळून आला. त्यावरून संशय बळावल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी विहिरीत पाहणी केली असता युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. रविवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

युवकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे बोर्डा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. युवकाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


No comments:

Powered by Blogger.