शहरालगत असलेल्या गणेशपुर परिसरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा कुलूपबंद घर फोडून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगलमुर्ती पार्क, प्लॉट क्र. ४२ येथे राहणारे रामरतन सिताराम हरडे (वय ५९), हे वेकोलीत नोकरीला असून ते २१ एप्रिल रोजी दुपारी घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते. दरम्यान, २१ एप्रिल दुपारी ४ ते २२ एप्रिल दुपारी ३ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान दागिन्यांवर हात साफ केला.
चोरट्यांनी दोन सोन्याच्या बांगड्या (४० ग्रॅम, किंमत १,२०,००० रु.), एक सोन्याचा गोफ (२० ग्रॅम, ६०,००० रु.), दोन अंगठ्या (१० ग्रॅम, ३०,००० रु.) तसेच कानातील लटकन (६ ग्रॅम, २०,००० रु.) असे एकूण ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या दागिन्यांची एकूण किंमत २,३०,००० रुपये एवढी आहे.
या प्रकरणी रामरतन हरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद करीत आहेत.
दरम्यान, वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून, पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांवर लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.

No comments: