शेतीप्रधान यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळल्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेसचे वणी तालुका अध्यक्ष विकेश पानघाटे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या निवेदनात, यवतमाळ जिल्हा हा नैसर्गिक आपत्तींना वारंवार सामोरे जाणारा शेतीप्रधान जिल्हा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड व रोगांमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत असताना पीक विमा योजना हीच त्यांच्यासाठी महत्त्वाचे संरक्षण कवच ठरत होती. मात्र, जिल्ह्याला या योजनेतून वगळल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी वर्गातून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील इतर जिल्हे योजनेत समाविष्ट असताना यवतमाळला वगळण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. आणेवारी कमी असतानाही विम्यापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचेही निवेदनातून अधोरेखित करण्यात आले. एप्रिल महिन्यातील अल्प कालावधीतच अनेक शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याचा आधार काढून घेतल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचा तात्काळ पीक विमा योजनेत समावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्णयाकडे आता शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदन देतांना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: