प्रशांत चंदनखेडे वणी :-
उकणी प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला राजकीय पातळीवरही पाठिंबा मिळू लागला असून, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाला ठामपणे समर्थन दर्शविले आहे. त्यामुळे या प्रश्नाला आता अधिक धार मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
उकणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी ३ मेपासून चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची त्यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
मौजा उकणी व परिसरातील सुशिक्षित, कुशल-अकुशल तसेच बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा, तसेच सुमारे २०० स्थानिक कामगारांना एम/एस नारायणी अँड सन्स कंपनीमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विशेषतः हेव्ही लायसन्स धारक चालकांनाही प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. एरव्ही प्रकल्पग्रस्तांना कंपनीत रोजगार देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे ३ मेपर्यंतचा अंतिम अल्टिमेटम देण्यात आला असून, तोपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवेदनाची दखल घेत आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवित संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला बळ मिळाले आहे.
या भेटीदरम्यान समितीचे अध्यक्ष स्वप्नील गोवारदीपे, उपाध्यक्ष अजय खाडे, सचिव विजय कार्लेकर, कार्याध्यक्ष विनायक येसेकर, सहसचिव प्रभाकर खोब्रागडे, कोषाध्यक्ष मनोज खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर असताना आता या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन व कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



No comments: