प्रशांत चंदनखेडे वणी :-
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येते, हे शहरातील पट्टाचारा नगर येथे राहणाऱ्या वैष्णवी नितीन भालेराव हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवत वैष्णवीने वणी तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला असून तिच्या या नेत्रदीपक यशाने संपूर्ण शहराचा उर अभिमानाने भरून आला आहे.
लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवीने अत्यंत सामान्य कुटुंबातून येत असामान्य यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे केवळ शाळेचे नाव उज्ज्वल झाले नाही, तर मेहनतीने संसार उभा करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचेही चीज झाले आहे. दहावीच्या निकालात गुणवत्ता यादीत झळकलेल्या वैष्णवीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
रेल्वे स्टेशन परिसराकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या पट्टाचारा नगर या श्रमिकांच्या छोट्याशा वस्तीत वैष्णवीचे कुटुंब वास्तव्यास आहे. वडील नितीन भालेराव हे एका दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत कष्टाळू आणि साध्या स्वभावाचे असलेल्या नितीन भालेराव यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांच्या शिक्षणात कधीच तडजोड होऊ दिली नाही. “शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचे साधन आहे,” हा संस्कार त्यांनी आपल्या मुलांमध्ये रुजविला.
वडिलांची मेहनत, त्याग आणि संघर्ष जवळून पाहणाऱ्या वैष्णवीनेही अभ्यासात सातत्य ठेवले. मोबाईल, मनोरंजन आणि बाह्य आकर्षणांपासून दूर राहत तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. नियोजनबद्ध अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. तिच्या या यशाने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
वैष्णवीच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याची भावना तिने व्यक्त केली. “आमच्या मुलीने मेहनतीचे चीज केले. तिच्या शिक्षणात पुढेही कुठलीच कमी पडू देणार नाही,” असा आत्मविश्वास वडील नितीन भालेराव यांनी व्यक्त केला. तर वैष्णवीने उच्च शिक्षण घेऊन मोठे ध्येय गाठण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“परिस्थिती गरीब असली तरी स्वप्ने मोठी असावीत,” हा संदेश वैष्णवीच्या यशातून समोर आला आहे. संघर्षातून उभे राहून तिने मिळविलेल्या या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी तिचे कौतुक केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लोकसंदेश न्यूज परिवाराकडून वैष्णवी नितीन भालेराव हिचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!



No comments: