Latest News

Latest News
Loading...

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन तरुणीला पळविले; वडिलांची पोलिसांत धाव

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मारेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी (वय १७ वर्ष ९ महिने) ही मारेगाव येथील एका महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. नुकताच बारावीचा निकाल लागला असून ती परीक्षेत उत्तीर्ण देखील झाली आहे.

७ मे रोजी रात्री कुटुंबीयांनी एकत्र जेवण करून सर्वजण घराच्या नवीन बांधकामाला पाणी मारण्याचे काम करत होते. त्यानंतर रात्री उशिरा सर्वजण झोपी गेले. मात्र ८ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वडील झोपेतून उठले असता त्यांना मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक, शेजारी आणि परिसरात शोध घेतला; मात्र मुलगी कुठेही आढळून आली नाही. दरम्यान, ग्राम मांगरुळ येथील एका तरुणासोबत (वय २३) मुलीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. मुलीच्या वडिलांनी संशयिताच्या घरी जाऊन चौकशी केली असता तोदेखील रात्रीपासून घरून गायब असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यानेच अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा दाट संशय वडिलांनी तक्रारीतून व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे. मारेगाव पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलगी व संशयिताचा शोध सुरू केला आहे.

No comments:

Powered by Blogger.