शहरातील बेलदारपुरा परिसरात बंद घर हेरून महिलांच्या टोळीने घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील बाजूने प्रवेश करत चोरट्यांनी आतील दाराचे कुलूप तोडून तब्बल ७० हजार रुपयांचे पितळ, तांबे, जर्मन आणि स्टीलचे भांडे लंपास केले. ही चोरीची घटना २३ एप्रिलला उघडकीस आली असून या घटनेची ७ मे ला पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे, चोरी करून पसार होणाऱ्या चार महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राजामणी पृथ्वीराज चव्हाण (रा. बेलदारपुरा, वणी) यांनी वणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चार महिलांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजामणी चव्हाण या काही दिवसांसाठी निजामाबाद जिल्ह्यातील माहेरी गेल्या होत्या. घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावण्यात आले होते. तर मागील बाजूचा दरवाजा तुटलेला असल्याने तो विटा लावून बंद करण्यात आला होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्या महिलांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला आणि आतील कुलूप तोडून घरातील मौल्यवान भांडी चोरून नेली.
२३ एप्रिल रोजी शेजारील महिलेने घराचे दार उघडे असल्याची माहिती दिल्यानंतर राजामणी चव्हाण या वणी येथे परतल्या. घरात पाहणी केली असता संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. पितळी पराती, समई, तांब्याचे हांडे, जर्मन गंज, स्टीलची भांडी, कुकर, मिक्सर, फॅनसह अनेक वस्तू चोरीला गेल्याचे उघड झाले.
यानंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चार महिला पोत्यांमध्ये सामान भरून नेताना स्पष्ट दिसून आल्या. दुपारच्या सुमारास अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ही घरफोडी करण्यात आल्याचे फुटेजवरून स्पष्ट होत आहे. महिलांनी घर बंद असल्याची खात्री करूनच चोरी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, शहरात घरफोडीसाठी महिलांच्या टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बंद घरे चोरट्यांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलांचा शोध सुरू केला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

No comments: