Latest News

Latest News
Loading...

उकनी कोळसाखाण दुर्घटनेनंतर आमदार संजय देरकर यांची घटनास्थळाला भेट


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या उकनी कोळसाखाणीत शुक्रवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असताना वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वेकोलि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर संताप व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांची घटनास्थळीच कानउघाडणी केली.

उकनी खाणीत भूगर्भातून कोळसा उत्खनन सुरू असताना साचलेल्या गाळयुक्त पाण्याला रोखून धरणारा मातीचा शिल्ड अचानक फुटल्याने चिखल, गाळ आणि पाण्याचा प्रचंड लोंढा उत्खनन क्षेत्रात घुसला. या भीषण प्रवाहात दोन महाकाय डंपर चिखलात गाडले गेले. सुदैवाने चालकांनी प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर खाण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आमदार संजय देरकर यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. दुर्घटनास्थळावरील भयावह परिस्थिती पाहून त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षा उपाययोजनांबाबत जाब विचारला.

“कामगार रोज जीव धोक्यात घालून काम करतात आणि प्रशासन सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करते, हे अत्यंत गंभीर आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आज सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र भविष्यात अशी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवालही त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. शिल्ड फुटल्यानंतर आलेल्या गाळयुक्त पाण्याच्या लोंढ्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. एका डंपरचा चालक वाहनातच अडकला होता; मात्र प्रसंगावधान राखत तो कसाबसा वाहनाच्या बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला.

आमदार देरकर यांनी घटनास्थळीच उपक्षेत्रीय प्रबंधक स्वामी व इतर अधिकाऱ्यांना सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. खाण क्षेत्रातील सर्व सुरक्षा व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी, संभाव्य धोकादायक भागांचा आढावा घ्यावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा कडक सूचनाही दिल्या.

घटनास्थळी आमदार संजय देरकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वेकोलि अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका उपस्थित कामगार आणि ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे, टिकाराम खाडे, संजय देठे, गुलाब आवारी, जगण जुनगरी, विनोद ढुमणे, अजय दुबे, शंकर देरकर यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.