Latest News

Latest News
Loading...

उकनी कोळसाखाणीत थरारक दुर्घटना; शिल्ड फुटताच चिखल-पाण्याच्या महाप्रवाहात दोन डंपर गडप

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वेकोलिच्या उकनी कोळसाखाणीत शुक्रवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण वेकोलि क्षेत्र हादरून गेले. भूगर्भातून कोळसा बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या खोल उत्खननादरम्यान साचलेले गाळयुक्त पाणी रोखून धरणारा मातीचा शिल्ड अचानक फुटला आणि काही क्षणांतच चिखल, गाळ व पाण्याचा महाकाय लोंढा उत्खनन क्षेत्रात घुसला. या प्रचंड प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन कोळसा वाहतूक करणारे दोन महाकाय डंपर चिखलमातीत अक्षरशः गडप झाले. या थरारक घटनेत दोन चालकांचे प्राण थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेनंतर खाण परिसरात एकच गोंधळ उडाला. काही क्षणांपूर्वी सुरू असलेले नियमित उत्खनन अचानक भीषण संकटात बदलल्याने कामगार भयभीत झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शिल्ड फुटल्यानंतर प्रचंड वेगाने आलेल्या गाळयुक्त पाण्याने काही सेकंदांत संपूर्ण परिसर हादरवून टाकला. डंपर चालकांना काहीच समजण्याच्या आत चिखलाचा लोट वाहनांवर आदळला आणि दोन्ही डंपर खोल गाळात रुतले.

विशेष म्हणजे, दुर्घटना घडली त्यावेळी एका डंपरचा चालक वाहनातच बसलेला होता. समोर मृत्यू उभा ठाकल्याची जाणीव होताच प्रसंगावधान राखत तो कसाबसा वाहनातून बाहेर पडला. काही क्षणांचा विलंब झाला असता तर तोही चिखलाच्या गर्तेत गडप झाला असता, अशी चर्चा घटनास्थळी होती. चालकांच्या समयसूचकतेमुळेच मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, उकनी कोळसाखाणीत सध्या मोठ्या प्रमाणात खोल उत्खनन सुरू असून जमिनीच्या गर्भातून कोळसा बाहेर काढण्यासाठी महाकाय यंत्रांचा वापर केला जात आहे. खोल खड्ड्यांमध्ये झऱ्याचे व पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने ते एका बाजूला रोखण्यासाठी मुरूम व मातीचा बांध उभारण्यात आला होता. मात्र सततच्या खोल उत्खननामुळे हा शिल्ड कमकुवत झाला आणि अखेर अचानक कोसळला.

या घटनेने वेकोलिच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उत्खनन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते का? अशा प्रश्नांची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. कामगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात आणखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, दुर्घटनेनंतर वेकोलि प्रशासन व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी उकनी खाणीत घडलेल्या या घटनेने कोळसाखाणीतील धोकादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे.

No comments:

Powered by Blogger.