मारेगाव तालुक्यातील खंडणी परिसरात अंगणवाडी सेविकेला एकटं गाठून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने रस्त्यात अडवून जबरदस्तीने बाजूला ओढत नेत कपडे फाडून विनयभंग केल्याचा आरोप असून, जातीवाचक व अश्लील शिवीगाळही केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या अंगणवाडी सेविका (वय ५०) या २५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजता खंडणी ते भुरकीपोड मार्गाने ड्युटीवर जात असताना ही घटना घडली. आरोपी अब्दुल असिम अब्दुल गफुर शेख (वय ५५, रा. मारेगाव) याने त्यांना अडवून जबरदस्तीने ओढत नेत गैरवर्तन केले, असा आरोप आहे. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली. घडलेल्या प्रसंगाने त्या प्रचंड घाबरल्या.
घटनेनंतर आरोपीकडून मुलांना इजा होण्याची भीती तसेच बदनामीच्या धास्तीमुळे फिर्यादीने तक्रार देण्यास विलंब केल्याचे समोर आले आहे. मात्र अखेर धैर्य दाखवत त्यांनी पोलीस ठाणे गाठून त्यांच्याशी गैरकृत्य करणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार नोंदविली.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments: