हरभरा खरेदी ठप्प; शेतकऱ्यांची कोंडी वाढली, खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची शिवसेनेची (उबाठा) मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यात मागील आठ दिवसांपासून नाफेडमार्फत हरभरा खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला हरभरा (चणा) विक्रीसाठी बाजारात आणला असताना नाफेड केंद्रे बंद असल्याने त्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे वळावे लागत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यापारी कमी दराने चणा खरेदी करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अनेक ठिकाणी अडतच्या नावाखाली अवाजवी कपात केली जात असून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचाही आरोप करण्यात आला.
आधीच नापिकी, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत आला असताना खरेदी बंद राहिल्याने त्यांची कोंडी अधिकच वाढली आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना तातडीने रोख रक्कमेची आवश्यकता असताना हरभरा विक्रीत अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
यावेळी आमदार देरकर यांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या. त्यामध्ये नाफेड खरेदी तात्काळ सुरू करणे, खासगी बाजारातील अनियमित व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, बेकायदेशीर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणे, अडत पद्धत बंद करणे आणि नाफेड केंद्रांवर ५० किलोमागे होत असलेली १०० रुपयांची कपात त्वरित थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी या मागण्यांची दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. मात्र, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संतोष कुचनकर यांनी यावेळी मागण्यांचे निवेदन सादर केले. बैठकीस जिल्हाप्रमुख संजय निखाडे, शहरप्रमुख विनोद ढुमणे, गटनेते सुधीर थेरे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: