Latest News

Latest News
Loading...

कायर येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी; गाळामुळे पाणी साठवण क्षमतेवर परिणाम

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील कायर येथील मृदा व जलसंधारण विभागाच्या बंधाऱ्यात (माथाडी) मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची पाणी साठवण क्षमता घटली असून, तात्काळ गाळ काढून खोलीकरण व दुरुस्ती करावी, अशी मागणी कायर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नागेश धनकसार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कायर गावासमोरील भूडकेश्वर देवस्थान परिसरात असलेला हा माथाडी बंधारा पूर्वी शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत होता. या बंधाऱ्यातून ७०० ते ७५० शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे सिंचन व्हायचे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता देखील मोठ्या प्रमाणात असून, अनेक शेततळ्यांइतका जलसाठा येथे उपलब्ध होत असे.

मात्र, कालांतराने बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची खोली व क्षमता दोन्ही कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी पावसाळ्यात येथे पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने शेती सिंचनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा बंधारा गाळमुक्त करून त्याचे खोलीकरण, रुंदीकरण व आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

याबाबत संबंधित विभागाला यापूर्वीही निवेदन देण्यात आले असल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे. कामाचे स्वरूप मोठे असल्याने लोकसहभागातून ते पूर्ण होणे शक्य नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे प्रशासनाने या कामाला प्राधान्य देऊन शासन स्तरावरून मंजुरी देत तातडीने गाळ काढण्याचे व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामामुळे पुन्हा एकदा बंधाऱ्याची जल साठवण क्षमता वाढून परिसरातील शेतीला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

No comments:

Powered by Blogger.