Latest News

Latest News
Loading...

एमआरपीला हरताळ; बियर शॉपींमध्ये ग्राहकांची उघड लूट, उत्पादन शुल्क विभाग ‘गप्प’

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील बियर विक्रीच्या दुकानांमध्ये छापील किमतीचा उघड भंग करत जादा दराने बियर विक्री सुरू असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एमआरपीपेक्षा थेट २० ते ३० रुपये अधिक आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असून, या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बियरची मागणी वाढताच काही परवानाधारक विक्रेत्यांनी मनमानीचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते. शहरातील अनेक बियर शॉपींमध्ये छापील किमतीऐवजी ‘दुकानदार ठरवेल तोच दर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकांनी दराबाबत जाब विचारल्यास उलट अरेरावीची भाषा वापरण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे “एमआरपीचा अर्थ काय?” असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.

या प्रकारामागे उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियताच कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “तक्रार केली तरी काहीच होत नाही,” अशी भावना ग्राहकांतून व्यक्त होत असून विक्रेत्यांशी असलेल्या ‘मधुर संबंधां’मुळेच कारवाईची धार बोथट झाल्याची चर्चा रंगली आहे. काही विक्रेते तर “कुणालाही सांगा, आम्हाला फरक पडत नाही,” अशा उघड अरेरावीने बोलत असल्याचेही समोर आले आहे.

नियमांचे उल्लंघन केवळ दरापुरते मर्यादित नसून अनेक बियर शॉपी रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे पाहायला मिळते. रात्री १० नंतर दुकाने बंद ठेवण्याचा नियम असतानाही काही ठिकाणी उशिरापर्यंत विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी बियर शॉपींमध्येच ग्राहकांना बियर पिण्याची मुभा दिली जात असल्याने बियर शॉपींना बारचे स्वरूप प्राप्त होत असल्याचेही दिसून येते.

या सर्व प्रकारामुळे शहरात नियम व कायद्याचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्राहकांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन एमआरपीला हरताळ फासणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ  कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. “परवानाधारकांच्या या नियमबाह्य दर आकारण्यावर अंकुश कधी लागणार?” हा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



No comments:

Powered by Blogger.