Latest News

Latest News
Loading...

लग्नातील जुन्या वादातून वृद्धाला मारहाण; काठीने फोडले डोके


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जुन्या वादातून गावात भरदिवसा झालेल्या मारहाणीच्या घटनेने मार्डी परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नातील किरकोळ वाद उकरून काढत एका इसमाने ६० वर्षीय शेतमजुरावर काठीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबाराम रामेश्वर सोयाम (वय ६०, रा. मार्डी) हे गुरुवारी सकाळी आपल्या पुतणीच्या लग्नकार्याच्या निमित्ताने पाहुण्यांना बोलवण्यासाठी भावाच्या घरी जात होते. त्यावेळी गावातील संतोष नथ्थुजी सोयाम (वय अंदाजे ४७) याने त्यांना अडवून मुलाच्या लग्नावेळी मला शिव्या का दिल्या, असा जाब विचारत त्यांना शिवीगाळ सुरू केली.

वाद वाढल्यानंतर आरोपीने घरातून काठी आणून बाबाराम सोयाम यांच्या कपाळावर व डोक्यावर मारल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यातून रक्तस्राव होऊ लागला. दोघांमध्ये सुरु असलेला वाद व झालेल्या मारहाणीमुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. झगड्याचा आवाज ऐकून गावातील सुनिल उईके व विनोद बोबडे यांनी धाव घेत दोघांचे भांडण सोडविले.

त्यानंतर जखमी अवस्थेतच बाबाराम सोयाम यांनी मुलासह मारेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यांची तक्रार व वैद्यकीय अहवालावरून पोलीसांनी आरोपी संतोष सोयाम याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गावातील कौटुंबिक वादातून पुन्हा एकदा हिंसक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोउपनि दिगांबर किनाके व पो. शि. सागर दिपेवार करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.