Latest News

Latest News
Loading...

“कूलिंग चार्जेस”च्या नावाखाली ग्राहकांची लूट? एमआरपीपेक्षा जादा दराने बीअर विक्री; कारवाईसाठी प्रहार तालुका सचिवाची तक्रार

प्रतीकात्मक फोटो 
प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील बीअर शॉपींमध्ये छापील किंमतीपेक्षा जादा दराने सर्रास बीअर विक्री होत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाने संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “कूलिंग चार्जेस” आणि “सर्व्हिस चार्जेस”च्या नावाखाली ग्राहकांच्या खिशावर सर्रास डल्ला मारला जात असल्याचा गंभीर आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बीअरची मागणी वाढताच शहरातील अनेक बीअर शॉपींमध्ये एमआरपीपेक्षा २० ते ३० रुपये अधिक आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ग्राहकांनी याबाबत विचारणा केल्यास “थंड बीअर आहे, एक्स्ट्रा पैसे लागतील” असे सांगत अतिरिक्त रक्कम उकळली जात असल्याचेही समोर आले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी तालुका सचिव मुन्ना येरेकर यांनी या प्रकाराविरोधात पोलीस निरीक्षकांच्या नावे लेखी तक्रार देतांनाच संबंधित विभागांकडेही कारवाईची मागणी केली आहे. “एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री करणे हे Legal Metrology Act 2009 आणि Consumer Protection Act 2019 च्या स्पष्ट उल्लंघनात येते. परवानाधारक विक्रेते कायद्याची पायमल्ली करून ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहेत,” असा आरोप त्यांनी तक्रारीतून केला.

महाराष्ट्रातील मद्यविक्री नियमांनुसार बाटलीवर नमूद केलेल्या किंमतीपेक्षा अधिक दर आकारणे बेकायदेशीर असताना, शहरातील काही विक्रेते सर्रास नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा दुकानांवर तातडीने छापेमारी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वजा तक्रार प्रहारने केली आहे.

यावेळी तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे, शहरप्रमुख सचिन राखुंडे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या तक्रारीच्या प्रतिलिपी संबंधित शासकीय विभागांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

शहरात बीअर विक्रीतील मनमानी दरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन आता कारवाई करते की केवळ कागदी घोडे नाचवते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.