वडगाव धंदीर प्लॉट घोटाळा अखेर फुटला ! पत्रकाराच्या लढ्यापुढे प्रशासन झुकले; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हे
प्रशांत चंदनखेडे वणी :-
खोटे फेरफार, बनावट सातबारा, संशयास्पद नोंदी आणि महसूल विभागातील कथित संगनमताच्या जोरावर प्लॉट विक्रीचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, एका पत्रकाराची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी आणि दलालांसह चौघांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, तब्बल दोन वर्षे न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षानंतर ही कारवाई झाली असून, पत्रकारांच्या एकजुटीमुळेच प्रशासनाला झुकावे लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
शहरालगतच्या मौजा वडगाव धंदीर येथील प्लॉट व्यवहारातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला. एका व्यक्तीच्या मालकीचा प्लॉट दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर दाखवत बनावट फेरफार तयार करण्यात आला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीही कागदपत्रांच्या वैधतेबाबत शिक्कामोर्तब केल्याने फिर्यादींचा विश्वास बसला आणि व्यवहार पूर्ण झाला. मात्र काही महिन्यांतच या व्यवहारामागील काळं सत्य बाहेर आलं.
फिर्यादी सुरज चाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ज्या प्लॉटची विक्री करण्यात आली, तो प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधितांना जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पुढे महसूल विभागातीलच काही अधिकाऱ्यांनी फेरफार बोगस असल्याचे कबूल केल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
या घोटाळ्यात बनावट फेरफार क्रमांक तयार करून सातबाऱ्यावर नोंदी चढवण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नाही, तर मूळ व्यवहारच अस्तित्वात नसताना कागदपत्रे तयार करून प्लॉट विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. या व्यवहारात तब्बल १ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हे दाखल व्हावेत यासाठी संबंधित पत्रकाराने पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाचे अक्षरशः उंबरठे झिजविले. मात्र स्थानिक स्तरावर कारवाईस टाळाटाळ होत असल्याने अखेर शहरातील पत्रकार संतप्त झाले. शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी पत्रकारांनी थेट पोलीस स्टेशन गाठत ठाण मांडले. पत्रकारांनी तब्बल पाच ते सहा तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे शेवटी पोलिसांना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागले.
यावेळी विधितज्ज्ञ ॲड. निलेश चौधरी यांनीही उपस्थित राहत कायदेशीर बाजू पोलिसांसमोर मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर अखेर शैलेश वाकडे, सतीश केराम, तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२), ३(५) अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमताचे गुन्हे नोंदविण्यात आले.
या कारवाईमुळे महसूल विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपासात आणखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, “पत्रकार एकवटले नसते तर हा घोटाळा दडपला गेला असता,” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

No comments: