Latest News

Latest News
Loading...

(Breaking News) घरात घुसून शेजाऱ्यावर सत्तूर हल्ला; अज्ञात कारणावरून घडली थरारक घटना

प्रतीकात्मक फोटो 

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यातील वारगाव (चारगाव) येथे अज्ञात कारणावरून शेजाऱ्यावर धारदार सत्तूरने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा झालेल्या या रक्तरंजित हल्ल्याने परिसर हादरून गेला आहे. या थरारक घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सत्तूर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर चंद्रपूर येथे शर्थीचे उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वारगाव येथे बुधवार, १३ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विकास रामकिशन सातपुते (३६) आणि शंकर सुधाकर डाखरे (२६) हे एकमेकांचे शेजारी आहेत. अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून आरोपी शंकर डाखरे याने विकास सातपुते यांच्या घरात घुसून ते झोपेत असतांना त्यांच्यावर धारदार सत्तूरने वार केल्याची माहिती समोर आली आहे.

या अचानक झालेल्या हल्ल्यात विकास सातपुते गंभीर जखमी झाले. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. रक्तबंबाळ अवस्थेत युवकाला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमीच्या तक्रारीवरून आरोपी शंकर डाखरे याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १०९ आणि ३३३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला घटनेच्या रात्रीच अटक केली.

या घटनेमुळे वारगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भरदिवसा घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धीरज गुल्हाने करीत आहेत.


No comments:

Powered by Blogger.