Latest News

Latest News
Loading...

मारेगावच्या विकासात ‘नमो उद्याना’ची भर; ७९ लाखांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वेगाने बदलणाऱ्या शहरी जीवनात नागरिकांना स्वच्छ, हरित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, या उद्देशाने मारेगाव शहरात “नमो उद्यान” हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. “वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजना २०२५-२६” अंतर्गत मारेगाव नगर पंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या उद्यानाचे भूमिपूजन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

प्रभाग क्रमांक ४ मधील लक्ष्मी नगर ले-आऊट येथील ओपन स्पेसवर सुमारे ७९ लाख २३ हजार रुपयांच्या निधीतून हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मारेगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले सार्वजनिक विरंगुळा केंद्र उपलब्ध होणार आहे.

भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार संजय देरकर यांनी शहर विकासाची व्यापक संकल्पना मांडली. “विकास म्हणजे केवळ काँक्रीटच्या इमारती नव्हेत, तर नागरिकांच्या आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी हरित परिसर निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘नमो उद्यान’ हे भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की होते. यावेळी उपनगराध्यक्षा हर्षा महाकुलकर, बांधकाम सभापती जितेंद्र नगराळे, नगरसेविका शेख अंजुम शेख नबी, नगरसेवक नंदेश्वर आसूटकर, छाया किनाके, अनिल गेडाम, पुरुषोत्तम बुट्टे, शिवसेना तालुका प्रमुख दुमदेव बेलेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्यानामध्ये फिरण्यासाठी आकर्षक पथमार्ग, मुलांसाठी खेळाची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, हिरवळ आणि अन्य आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याचा समतोल साधणारा हा प्रकल्प मारेगावच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे हे उद्यान भविष्यात मारेगावची नवी ओळख ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. भूमिपूजनानंतर प्रकल्पाच्या कामास औपचारिक सुरुवात करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.