Latest News

Latest News
Loading...

डिझेल टंचाईने बळीराजा संकटात; मनसेचा प्रशासनाला थेट इशारा! “दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू”


प्रशांत चंदनखेडे वणी :-

खरीप हंगामाची चाहूल लागली असताना तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. शेतशिवारात मशागतीची लगबग सुरू असतानाच इंधनासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

“डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. हे तातडीने थांबले नाही तर मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा मनसेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला. उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांना थेट जबाबदार धरत तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती मशागतीची कामे करत आहेत. आगामी पेरणीच्या दृष्टीने प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानला जात असताना डिझेल मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबत असल्याची गंभीर बाब मनसेने अधोरेखित केली आहे. “शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत आहे. त्यात आता इंधन टंचाईचे संकट निर्माण झाल्याने बळीराजा दुहेरी कचाट्यात सापडला आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले.
मनसेने सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधत, इंधन दरवाढीसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप केला आहे. “सामान्य नागरिक आणि शेतकरी यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून बाजारात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने सर्व पेट्रोल पंपांना शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल देण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत,” अशी मागणी करण्यात आली आहे.

फाल्गुन गोहोकार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना म्हटले की, “डिझेलअभावी जर एका जरी शेतकऱ्याचे नुकसान झाले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. दोन दिवसांत परिस्थिती सुरळीत झाली नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन उभे राहील. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकच जबाबदार राहतील.”

मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता प्रशासन या प्रश्नावर किती तत्परतेने पावले उचलते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे यांच्यासह राकेश वैद्य, विनोद कुचनकर, धीरज पिदुरकर, वैभव पुराणकर, प्रतीक बुरडकर, मंगेश येटे, आशिष ठावरी, भोला चिकनकर, प्रवीण मांडवकर, प्रदीप बदखल, चेतन काळे, गोवर्धन पिदुरकर, मनोज उरकुडे, देवा साखरकर, सुरज काकडे, धीरज बगवा, कैलास धांडे, सुरज लोंढे, यशवंत ढोके, बबलू चोपणे, संदीप अवगान, अजय तुराणकर यांच्यासह  मनसे सैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.