गोपालपूरमध्ये रक्तरंजित थरार! महिलेचा धारदार हत्याराने गळा चिरून खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
प्रशांत चंदनखेडे वणी :-
गोपालपूर (कोलाम पोड) येथे सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला. पतीपासून वेगळे राहत असलेल्या एका महिलेचा अज्ञाताने धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. कमलाबाई हुसैन मेश्राम (५१) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी संशयाची सुई तिच्या पतीकडे वळली आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
गोपालपूर येथील कोलाम पोड परिसरात राहणाऱ्या कमलाबाई मेश्राम या गेल्या काही दिवसांपासून पतीपासून वेगळ्या राहत होत्या. कौटुंबिक वाद आणि पतीचा सततचा संशय यामुळे त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली.
“कमलाबाई यांचा खून झाला असून त्या सदाशिव वाघधरे यांच्या अंगणात पडल्या आहेत,” अशी माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर मृत महिलेचा भाऊ चंद्रभान आत्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे कमलाबाई या रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
ही घटना रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज असून, घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
दरम्यान, कमलाबाई यांचा पती हुसैन मेश्राम हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालत असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. “दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय घेऊन तो नेहमी भांडण करायचा,” अशी माहिती फिर्यादीकडून पोलिसांना देण्यात आली आहे. याच संशयातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणामुळे गोपालपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या रक्तरंजित हत्येमागील नेमके कारण काय, याचा उलगडा करण्यासाठी पांढरकवडा पोलीस सर्व अँगलने तपास करीत आहेत.



No comments: