प्रशांत चंदनखेडे वणी :-
अवैध गोवंश तस्करीवर शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत ३४ गोवंशीय बैलांची सुटका केली. मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत २० लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे गोवंशीय बैल असा एकूण २६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शिरपूर पोलिसांना १२ मे रोजी रात्री वणीकडून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय व तितकीच खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तात्काळ सतर्क झाले. शिरपूर-चारगाव चौकी मार्गावर नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली.
दरम्यान, वणीकडून येणारा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (क्र. NL 01 AG 1288) पोलिसांना संशयास्पद वाटल्याने तो थांबविण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता कंटेनरमध्ये ३४ गोवंशीय बैल अत्यंत अमानुष पद्धतीने एकमेकांना आखूड दोऱ्यांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. जनावरांना हालचाल करण्यासाठीही जागा नसल्याचे दिसून आले.
वाहतुकीसंदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे चालकाकडे नसल्याने पोलिसांनी त्याची सखोल व कसून चौकशी केली. यावेळी वाहन चालक सरगम गुलाबसिंग धुर्वे याने नागपूर येथील तोसिक अहमद आणि गडचांदूर येथील इरफान यांच्या सांगण्यावरून ही गोवंश वाहतूक केली जात असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांना गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ वाहन आणि जनावरे ताब्यात घेतली.
या कारवाईत २० लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३४ गोवंशीय बैल असा एकूण २६.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, जनावरांची अत्यंत क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. शिरपूर पोलिसांनी वेळेवर कारवाई केल्याने ३४ गोवंशीय बैलांचा जीव वाचल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मनवर, पोउपनि धीरज गुल्हाने, पोहवा इकबाल शेख, प्रशांत झोड, अविनाश बानकर, पोकॉ. मंगेश सलाम, विजय फ़ुलूके, किरण दासरवार व पोलिस पथकाने पार पाडली.


No comments: