Latest News

Latest News
Loading...

राष्ट्रीय लोकअदालतीत श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेची दमदार कामगिरी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

थकीत कर्ज प्रकरणांचा वाढता ताण, न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च आणि कर्जदारांवरील मानसिक दबाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे व्यासपीठ प्रभावी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दि. ९ मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेने (वणी) उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १ कोटी ७८ लाख ७८ हजार ७३६ रुपयांची थकबाकी वसूल केली. तसेच १०५ थकीत कर्ज प्रकरणे तडजोडीद्वारे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.

विशेष म्हणजे, संस्थेच्या १५ शाखांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण २१४ थकीत कर्जदारांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कायदेशीर प्रक्रियेत अडकण्यापेक्षा सामंजस्याने मार्ग काढत कर्जमुक्त होण्याचा पर्याय अनेक कर्जदारांनी स्वीकारला. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे शांततेत मार्गी लागली.
कर्जदारांना न्यायालयीन खर्च, वेळ आणि मानसिक त्रासातून दिलासा देण्याचे काम राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून झाले. अनेकांनी स्वतःहून पुढाकार घेत थकीत कर्ज फेडण्यास तयारी दर्शविली. “तडजोडीतून प्रश्न सुटत असतील तर तोच सर्वोत्तम मार्ग,” अशी भावना यावेळी अनेक कर्जदारांनी व्यक्त केल्याचे समजते.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात ही विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी थकीत कर्जदारांना मार्गदर्शन करत कर्जमुक्तीची संधी साधण्याचे आवाहन केले. त्यांच्या समुपदेशनामुळे अनेक कर्जदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत थकीत प्रकरणे निकाली काढली.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शाखा व्यवस्थापक प्रविण नांदे, अमोल मांडवकर, अमोल काळे, संतोष गुगल, दिनेश झाडे, अभिजीत देठे, विलास बोबडे, अनिल वगारे, प्रज्ञा टोंगे, अभय काकडे तसेच वसुली पथक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून शांततेत आणि तडजोडीतून आर्थिक व्यवहार मार्गी लावण्याच्या या उपक्रमाचे सहकार क्षेत्रात विशेष कौतुक होत असून, थकीत कर्जदारांसाठी ही लोकअदालतीची मोहीम दिलासादायक ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.