प्रशांत चंदनखेडे वणी :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर शहरात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या चर्चांनी अचानक जोर धरला असून त्याचा परिणाम म्हणून पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत अनेक पेट्रोलपंपांवर नागरिकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
विशेषतः वणी-वरोरा मार्गावरील दत्त मंदिराजवळील पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा थेट मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. दुचाकी, चारचाकी वाहनांसह काही नागरिक चक्क ड्रम घेऊन डिझेल भरण्यासाठी आल्याचेही पाहायला मिळाले. अनेक वाहनधारकांनी “टँक फुल” करण्याकडे कल दर्शविल्याने पंप परिसरात मोठी वर्दळ निर्माण झाली होती.
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी इंधन टंचाईच्या अफवा पसरल्यानंतर जशा प्रकारे पेट्रोलपंपांवर गर्दी उसळली होती, तशाच स्वरूपाचे चित्र पुन्हा एकदा शहरात पाहायला मिळत आहे. “पुढील काही दिवसांत पेट्रोल-डिझेल मिळणार नाही” किंवा “पुरवठा कमी होणार” अशा चर्चांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षात पंतप्रधानांनी इंधनाचा संयमी वापर आणि बचतीचे आवाहन केले असले, तरी त्याचा वेगळाच अर्थ घेत काही नागरिकांनी इंधन साठवण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले. पेट्रोलपंपांवर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, इंधन टंचाईबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नसतानाही अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे “हा केवळ अफवांचा बाजार आहे की खरोखरच इंधन टंचाईची शक्यता आहे?” याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



No comments: