वणी शहरातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचा डाव उधळून लावत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रविवारी सायंकाळी धडक कारवाई केली. शहरातील शैक्षणिक परिसरालगत सुरू असलेल्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्रीवर छापा टाकत पथकाने दोन तरुणांना रंगेहात अटक केली. या कारवाईत एमडी ड्रग्जसह दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ६३ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष मोहीम सुरू केली असून, त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या वणी उपविभागीय पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, वणी शहरातील SPM शाळेच्या मागील बाजूस, नगर परिषद शाळा क्रमांक ३ समोरील मोकळ्या मैदानात काही तरुण एमडी ड्रग्जची विक्री करीत आहेत. माहितीची खातरजमा होताच पथकाने परिसरात सापळा रचला.
तेथे एका निळ्या रंगाच्या मोपेडजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले. पथकाने घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. सौरभ दिनेश खैरे (२५, रा. तेली फैल, वणी) आणि प्रथमेश विनोद गुंडेवार (२०, रा. भाग्यशाली नगर, वणी) अशी या ड्रग्ज विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्या ताब्यातून एलसीबी पथकाने ५ ग्रॅम ९१ मिलीग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, किंमत ४१ हजार ३७० रुपये तसेच रोख रक्कम, मोबाईल फोन आणि MH-29-CD-5776 क्रमांकाची मोपेड असा एकूण १ लाख ६३ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे ही कारवाई शाळा परिसरालगत करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांची व युवकांची मोठी वर्दळ असलेल्या भागातच अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब समोर आल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. तरुणांना नशेच्या दलदलीत ओढणारे हे जाळे किती खोलवर रुजले आहे, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणामागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू केला आहे. एमडी ड्रग्जचा पुरवठा कुठून होतो, आणखी किती युवक या रॅकेटशी जोडले गेले आहेत आणि जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे जाळे कुठवर पसरले आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे (स्थानिक गुन्हे शाखा) आणि वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोहेकॉ सुनील खंडागळे, सुधीर पांडे, पोकॉ. सलमान शेख, रजनीकांत मडावी आणि चालक पोहेकॉ नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेमुळे ड्रग्ज विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, वणी शहरातील तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्यांविरोधात पोलिसांचा कारवाईचा बडगा आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहे.

No comments: