प्रशांत चंदनखेडे वणी :-
रस्त्यावर कोसळलेल्या झाडाला मोटारसायकल धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार १३ जूनला रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास वणी-उकनी मार्गावरील कोलार फाट्याजवळ घडली. मृतकाचे नाव रोहित दुर्गेश हरिणखेडे (२६) रा. चांगुटोला जिल्हा बालाघाट (मध्यप्रदेश) असे असून तो वेकोलीशी अधिनस्त असलेल्या ओबी कंपनीत डंपर चालक म्हणून कामाला असल्याचे समजते.
सध्या बोरगाव (अहेरी) येथे वास्तव्यास असलेला हा युवक मूळचा मध्यप्रदेश प्रांतातील रहिवाशी असून तो रात्री आपल्या एका मित्राला सोडण्याकरिता वणीला गेला होता. मित्राला सोडून तो बोरगाव येथे परतत असतांना मार्गात कोसळलेल्या झाडाला त्याची मोटारसायकल धडकली. धडक एवढी जोरदार होती की युवकाचा जागीच मृत्यू झाला. वणी उकनी मार्गावर मागील दोन ते तीन दिवसांपासून एक मोठे झाड कोसळले होते. वेकोलिने कोळसाखान परिसरात लावलेल्या झाडांपैकी ते एक झाड होते.
नागरिकांच्या मार्गक्रमण करण्याच्या प्रमुख रस्त्यावर झाड कोसळलेले असतांना वेकोलिने ते झाड रस्त्यावरून हटविण्याचे साधे सौजन्य देखील दाखविले नाही. रात्रीच्या काळोखात झाड कोसळलेल्या ठिकाणाचा अंदाज न आल्याने युवक दुचाकीसह झाडाला धडकला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला, व मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: