Latest News

Latest News
Loading...

मुंगोली खदान परिसरात पोलिसांची मोठी कारवाई; देशी कट्ट्यासह कुख्यात आरोपीच्या आवळल्या मुसक्या


प्रशांत चंदनखेडे वणी :-

यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत शिरपूर पोलिसांनी आणखी एक मोठे यश मिळविले आहे. मुंगोली खदान परिसरात चोरीच्या उद्देशाने गावठी बनावटीचा देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला शिरपूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून एक देशी पिस्टल (कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शाहरुख गुलशेर खान उर्फ फावडा (३१, रा. आमराई वॉर्ड क्र. २, घुग्घुस, जि. चंद्रपूर) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र आणि गुंगीकारक पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांनी त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, १३ जूनच्या रात्री मुंगोली खदान परिसरात एक इसम देशी कट्टा घेऊन संशयास्पद हालचाली करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तात्काळ परिसरात सापळा रचला.

पुलाजवळ संशयास्पद वावर, पोलिसांची झडप
मुंगोली ते वर्धा नदी पुलाजवळ एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला गावठी बनावटीचा देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन शस्त्र जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या देशी कट्ट्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये, तर दोन जिवंत काडतुसांची किंमत २ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातील शस्त्राचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता, तसेच त्याचे इतर गुन्हेगारी संबंध आहेत का, याचा तपास सुरू आहे.

ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोहेकॉ सुनील दुबे, पोहवा अविनाश बानकर, इकबाल शेख, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे, दीपक वाकडे, किरण दासरवार आणि प्रफुल नाईक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून, शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.