Latest News

Latest News
Loading...

'हा एरिया आमचा!' म्हणत तृतीयपंथीयांच्या दोन गटांत राडा; पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला संघर्ष


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात पैसे (नेक वसुली) गोळा करण्याच्या हद्दीवरून तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये उफाळलेला वाद थेट वणी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकल्याने पोलीस ठाण्यातच शाब्दिक चकमक, आरडाओरड आणि गोंधळ उडाला. अखेर ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांचे समुपदेशन केले आणि संभाव्य संघर्ष टाळण्यात यश मिळवले.

माहितीनुसार, घरगुती शुभकार्यांमध्ये मिळणारी ओवाळणी, शहरात फिरून गोळा होणारी देणगी आणि पैसे मागण्याच्या कार्यक्षेत्रावरून हा वाद पेटला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील तृतीयपंथीयांचा गट अनेक वर्षांपासून वणी शहरात पैसे गोळा करत आहे. दरम्यान, यवतमाळ आणि अमरावती येथील दुसरा गटही वणीत सक्रिय झाल्यानंतर 'ही आमची हद्द' असा दावा करत दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळून आला.
वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस ठाण्यातही दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने वातावरण काही काळ तापले. त्यांच्यातील आरडाओरड आणि परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे पोलीस ठाण्याबाहेरही नागरिकांची मोठी गर्दी जमली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्र चर्चा केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, तसेच भविष्यात अशा प्रकारचा संघर्ष पुन्हा होऊ नये, याबाबत त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. समुपदेशनानंतर दोन्ही गटांनी आपापसातील वाद मिटवण्यास सहमती दर्शवली.

विशेष म्हणजे, भविष्यात पैसे गोळा करण्याच्या हद्दीवरून कोणताही वाद किंवा संघर्ष निर्माण करणार नाही, तसेच शहरातील शांतता भंग होईल असे कृत्य करणार नाही, असे दोन्ही गटप्रमुखांनी पोलिसांना लेखी स्वरूपात दिले.

या घटनेनंतर शहरात तृतीयपंथीयांच्या 'हद्द' वादाची जोरदार चर्चा रंगली असून, भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
 

No comments:

Powered by Blogger.