Latest News

Latest News
Loading...

ठाणेदार संतोष मनवर यांचा कौशल्यपूर्ण तपास, ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार अडकला जाळ्यात


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शिरपूर पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई करत एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराचा कौशल्यपूर्ण पद्धतीने शोध लावून त्याला नागपूर येथून अटक केली आहे. राजिक अन्सारी असे या ड्रग्ज माफियाचे नाव आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ड्रग्ज तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. पोलीस ड्रग्ज तस्करीवर बारीक लक्ष ठेऊन असून ड्रग्ज तस्करांचे पाळेमुळे शोधून काढत आहेत. दरम्यान शिरपूर पोलिसांनी ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात ११ फेब्रुवारीला ड्रग्ज तस्करीवर मोठी कारवाई केली होती. या धडक कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्जसह ९ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर श्रेयस उर्फ गुडू पाटील या ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. 
 
नंतर वणी पोलीस स्टेशन हद्दीतही ड्रग्ज तस्करी व विक्री करणाऱ्यांवर एका पाठोपाठ कारवाया झाल्या. मात्र ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पोलिसांच्या रडारवर असलेला व पोलिसांना वेळोवेळी हुलकावणी देणारा ड्रग्ज माफिया राजिक अन्सारी शेवटी शिरपूर पोलिसांच्या हाती लागला. 

शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांचं दूरवर पसरलेलं खबरी नेटवर्क आणि कौशल्यपूर्ण तपास पद्धती याच्या जोरावर त्यांनी ५ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधाराला नागपूर येथून मोठ्या शिताफीने अटक केली. तरुणाईला एमडी ड्रग्जच्या नशेची लत लावणाऱ्या तस्करांचं जाळं उद्धवस्त करण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली असून तस्करांचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरु केलं आहे. 

ड्रग्ज तस्करीच्या खोलात जाऊन तस्करांचे कनेक्शन कुठवर जुळले आहे, याचा पोलीस कौशल्यपूर्ण शोध लावत आहेत. वणी तालुक्यात ड्रग्ज पुरवणारा ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्ज नेटवर्क चालवणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष मनवर व शिरपूर पोलिसांनी केली. 

No comments:

Powered by Blogger.