Latest News

Latest News
Loading...

'भाऊ... मारेगावपर्यंत लिफ्ट द्या!'... आणि काही अंतरावरच घडला अपघात; अनोळखी प्रवाशाचा पाय फ्रॅक्चर

प्रतीकात्मक फोटो 
प्रशांत चंदनखेडे वणी :-

रस्त्यावर अनोळखी व्यक्तीला मदतीचा हात देताना क्षणभराचा निर्णय किती महागात पडू शकतो, याचा प्रत्यय वणी–मारेगाव मार्गावर घडलेल्या अपघातातून आला. पांढरकवड्याकडे निघालेल्या एका दुचाकीस्वाराने मानवतेच्या भावनेतून अनोळखी प्रवाशाला मोटारसायकलवर लिफ्ट दिली; मात्र काही अंतर पुढे जाताच चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्यावर आपटले. या अपघातात लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाचा पाय फ्रॅक्चर झाला, तर दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला.

पोलीस नोंदीनुसार, सोमनाळा येथील अक्षय बाबाराव संकिलवार (वय २६, ह.मु. अर्ली ता. केळापूर) हे रविवारी सायंकाळी वणीहून पांढरकवड्याकडे दुचाकीने (MH २९ CP ८०७९) निघाले होते. राजूर येथील पेट्रोल पंपाजवळ एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हात दाखवून मारेगावपर्यंत सोडण्याची विनंती केली. मदतीच्या हेतूने त्यांनी त्याला दुचाकीवर बसविले.

मात्र निंबाळा फाट्याजवळ पोहोचताच दुचाकी अचानक घसरली आणि दोघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात अक्षय संकिलवार यांच्या पाठ, चेहरा आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली. तर त्यांच्या मागे बसलेल्या अनोळखी प्रवाशाच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्याचा पाय मोडला. तसेच चेहरा आणि हातापायांनाही मार लागला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान जखमी प्रवाशाचे नाव अनिरुद्ध असल्याचे समोर आले. याप्रकरणी वणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

मानवतेचा हात... पण सावधगिरीही तितकीच महत्त्वाची
अनोळखी व्यक्तींना मदत करणे ही समाजाची संस्कृती असली, तरी रस्त्यावरील प्रवासात सुरक्षिततेला प्राधान्य देणे तितकेच आवश्यक आहे. "लिफ्ट मागणाऱ्याचा प्रवास तर काही मिनिटांचा होता, पण लिफ्ट मागून प्रवास करण्याची मोठी किंमत त्याला चुकवावी लागली," अशी चर्चा या अपघातानंतर परिसरात सुरू झाली. ही घटना वाहनचालकांसह प्रवाशांसाठीही सावधगिरीचा महत्त्वाचा संदेश देऊन गेली आहे.

No comments:

Powered by Blogger.