प्रशांत चंदनखेडे वणी :-
दंडगाव शिवारातील मार्डा धरण परिसरात आढळलेल्या युवकाच्या खूनप्रकरणाचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केल्यानंतरही मारेगाव पोलिसांनी तपासाची गती कमी होऊ दिली नाही. या हत्याकांडात आणखी दोघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. त्यानुसार सातत्याने शोधमोहीम राबवत अखेर फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या खूनप्रकरणातील मुख्य आरोपींना अटक झाल्यानंतरही मारेगाव पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि विविध धागेदोऱ्यांच्या आधारे तपास सुरू ठेवला. फरार आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. अखेर त्यांच्या लोकेशनची खात्री होताच पोलिसांनी रात्री छापा टाकून दोघांनाही त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रशांत उर्फ परशु उर्फ ठमकेश्वर पंढरी घागी (वय २०, रा. पावणा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) आणि कार्तिक सुनील निकोडे (वय १९, रा. नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. या अटकेनंतर या खूनप्रकरणातील अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, शंकर बारेकर, पोलीस शिपाई सागर दीपेवार, संभा लेणगुरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
खूनाचा उलगडा झाल्यानंतरही तपासाची साखळी न तोडता उर्वरित आरोपींना जेरबंद करण्यात मारेगाव पोलिसांनी दाखविलेली तत्परता या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

No comments: