प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील युवा, अभ्यासू आणि सर्वपरिचित पत्रकार प्रवीण दिवाणचंद शर्मा (४८) यांच्या अकस्मात निधनाने वणीच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राहत्या घरी स्नानगृहात अपघाती पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची जीवनाशी सुरू असलेली झुंज अपुरी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच पत्रकार, मित्रपरिवार आणि सर्व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
प्रवीण शर्मा हे सरकारमान्य 'मुक्त ललकार' या साप्ताहिकाचे संपादक होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत जबाबदारीने या साप्ताहिकाची धुरा सांभाळली आणि निर्भीड, वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा जपली. स्पष्ट मांडणी, सामाजिक भान आणि परखड लिखाण ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख होती. पत्रकारितेसोबतच त्यांनी मुद्रण व्यवसायही यशस्वीपणे सांभाळला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्याची त्यांची कायम तयारी असायची. कोणत्याही व्यक्तीचे काम मनापासून करून देणे, सहकार्याची भूमिका घेणे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. त्यामुळे पत्रकार म्हणूनच नव्हे, तर एक सुस्वभावी, दिलदार आणि माणुसकी जपणारा मित्र म्हणूनही त्यांनी अनेकांची मने जिंकली होती.
मित्रांसाठी सदैव धावून जाणारा, चेहऱ्यावर कायम हास्य ठेवणारा आणि नात्यांना मनापासून जपणारा हा माणूस अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने शहरातील पत्रकारिता क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती सहज भरून निघणारी नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
प्रवीण शर्मा यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तस्वकीय, पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि असंख्य हितचिंतक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने शहराने केवळ एक पत्रकार गमावलेला नाही, तर एक संवेदनशील, सच्चा आणि मनमिळावू माणूसही गमावला आहे.
पत्रकारितेच्या वाटेवर निर्भीडपणे चालणारा हा प्रवासी आता थांबला असला, तरी त्याच्या आठवणी, त्याचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि त्याची माणुसकी कायम स्मरणात राहील.
प्रवीण शर्मा यांना लोकसंदेश न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

No comments: