Latest News

Latest News
Loading...

वणीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; तिसरा आरोपी जेरबंद, एमडी ड्रग्जसह मुद्देमाल जप्त


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी कारवाईची व्याप्ती वाढवत आणखी एका आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी एसपीएम हायस्कूलमागील मोकळ्या पटांगणात ड्रग्ज विक्री करताना पकडलेल्या दोन आरोपींच्या चौकशीतून या रॅकेटचा आणखी एक साथीदार समोर आला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत ड्रग्ज आणि मोबाईलसह ६७ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन वणी येथे एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना अटकेत असलेल्या सौरभ दिनेश खैरे आणि प्रथमेश विनोद गुंडेवार या आरोपींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशीत त्यांनी या ड्रग्ज व्यवहारामागे आणखी एक साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय करून संशयिताचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान अक्षय उर्फ गोलू माधव पेचे (२७, रा. वरोरा, जि. चंद्रपूर) हा वणी शहरात वावरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या जवळ ७.५४ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ५२ हजार ७८० रुपये) आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत एमडी ड्रग्जसह अँड्रॉइड मोबाईल (किंमत १५ हजार रुपये) असा एकूण ६७ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आंतरजिल्हा ड्रग्ज नेटवर्कचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेले आरोपी हे केवळ किरकोळ विक्रेते नसून त्यांचे धागेदोरे आंतरजिल्हा पातळीवरील ड्रग्ज नेटवर्कशी जुडले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्याचे आर्थिक व्यवहार कसे चालत होते, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

वणी शहरात शैक्षणिक परिसराच्या जवळ ड्रग्ज विक्रीचे जाळे सक्रिय असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मात्र ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि साजिद सैय्यद आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

ड्रग्जविरोधातील मोहिमेला यश
अवघ्या काही दिवसांत सलग तीन आरोपींना अटक झाल्याने वणीतील ड्रग्ज तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी मुसंडी मारली असून, या कारवाईमुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.