Latest News

Latest News
Loading...

मुलीला दुचाकीने घेऊन जाणाऱ्या बापावर काळाचा घाला, बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी :-

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना वणी घुग्गुस मार्गावरील चारगाव चौकी येथील पेट्रोलपंपाजवळ गुरुवार ११ जूनला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या समोर दुचाकी काढत असतांना मागून भरधाव येणाऱ्या एसटी बसची मोटरसायकलला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. यात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. आणि चाकाखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रवींद्र बाळकृष्ण मालेकर वय अंदाजे ४५ वर्षे रा. शेलू असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेलू येथे राहणारे रवींद्र मालेकर हे आपल्या मुलीसह दुचाकीने चारगाव चौकी मार्गे प्रवास करीत असतांना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पास मारून ते पुढे जाण्यास निघाले. दरम्यान मागून भरधाव येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वडील आणि मुलगी दुचाकीवरून उसळून रस्त्यावर पडले. मुलगी विरुद्ध दिशेला तर वडील बसच्या दिशेने रस्त्यावर पडल्याने ते बसच्या चाकाखाली आले. बसचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने चाखाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसून असलेली १८ वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली. ती किरकोळ जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच आसपासच्या व मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि शिरपूर पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

शिरपूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार संतोष मनवर पथकासह घटनास्थळी पोहचले. या भीषण अपघाताने घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र ठाणेदार संतोष मनवर यांनी परिस्थिती योग्यरीत्या हाताळत वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला व परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

मुलीला दुचाकीने घेऊन जात असतांना काळाने घाला घातला व नियतीने वडिलांना कायमचे हिरावून घेतले. अपघातात डोळ्यासमोर वडील मृत्युमुखी पडले. आणि मुलगी धायमोकलून रडत होती. अपघाताने बापलेकीची कायमची तुटातूट केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. रस्त्यावर उभे राहणारे ट्रक अपघातास कारणीभूत ठरत असून बेजाबदारपणे रस्त्यावर ट्रक उभे करणाऱ्या चालक व त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.

No comments:

Powered by Blogger.