महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील ५९ जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात आंबेडकरी जनआंदोलनाच्या वतीने सोमवारी (२९ जून) शिरपूर येथे भव्य निषेध रॅली काढण्यात आली. हा निर्णय असंवैधानिक असून अनुसूचित जातींच्या एकसंघतेवर घाला घालणारा असल्याचा आरोप करत शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
निषेध रॅलीचे नेतृत्व आंबेडकरी जनआंदोलनाचे मुख्य संयोजक अनिल तेलंग तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य संजय वालकोंडे यांनी केले. रॅलीनंतर झालेल्या सभेत बोलताना अनिल तेलंग यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. हा निर्णय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत असून सामाजिक न्यायाच्या संकल्पनेलाच धक्का देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यातील भाजपा–शिवसेना (शिंदे)–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सरकारवर टीका करत आरक्षण व्यवस्थेला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात आला. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
निषेध रॅली यशस्वी करण्यासाठी राहुल गणविर, प्रकाश मुन, मिलिंद कांबळे, अनिल सातपुते, राहुल मुन, प्रदीप मुन, नेशाद ठमके, सचिन येलेकर, गौतम कांबळे, लक्ष्मण उमरे, पुरुषोत्तम वाढणकर, वसंतराव सोनटक्के, विनोद सोनटक्के, पांडुरंग पाटील, सचिन रामटेके, जितेंद्र रायपुरे, सदानंद तेलंग, जितेंद्र पथाडे यांच्यासह करुणा तेलंग, लता ठमके, काजल गणविर, किरण जुमळे, ताराबाई ठमके, संगीता पथाडे, पूजा पथाडे, अनिता मुन आदी महिला कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत परिश्रम घेतले.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात शिरपूरात निघालेल्या या निषेध रॅलीमुळे परिसरात सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली.

No comments: