प्रशांत चंदनखेडे वणी :-
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे रविवारी (२८ जून) आयोजित करण्यात आलेला पल्स पोलिओ कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. मोहिमेचे उद्घाटन ग्रामपंचायत कायरचे सरपंच नागेश धनकसार यांच्या हस्ते करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण १,६८९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबविली.
कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप येडमे, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष पिटलावार यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी उपस्थित केले.
"दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी" या घोषवाक्याला साजेसा प्रतिसाद मिळाल्याने ही मोहीम यशस्वी ठरली. पोलिओमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अशा मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या असून पालकांनी भविष्यातही लसीकरण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

No comments: