भाजप वणी शहराध्यक्ष म्हणून एक वर्षाची यशस्वी वाटचाल; ॲड. निलेश चौधरी यांचा रणजीत पाटील यांच्या हस्ते सत्कार
प्रशांत चंदनखेडे वणी :-
भारतीय जनता पार्टीच्या वणी शहराध्यक्षपदाची एक वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल ॲड. निलेश चौधरी यांचा पक्ष कार्यालयात माजी गृहराज्यमंत्री तथा माजी नगरविकास मंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष राकेश बुग्गेवर यांच्यासह शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना ॲड. निलेश चौधरी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. "एक वर्षापूर्वी वणी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविताना पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. संघटन चालविताना काहीवेळा कठोर, तर काहीवेळा संयमी भूमिका घ्यावी लागली. त्या प्रक्रियेत माझ्या कोणत्याही निर्णयामुळे अथवा कृतीमुळे कोणी दुखावले गेले असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो," असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुलसिंह चव्हाण तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे विशेष आभार मानले. मागील वर्षभरात वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच संघटनात्मक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता आल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ॲड. निलेश चौधरी यांच्या वर्षभरातील संघटनात्मक कार्याचा गौरव करत, आगामी काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली वणी शहरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

No comments: